मुंबई - बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आता कॉमेडिअन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना एनसीबीने समन्स पाठवले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस येत आहे. त्यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरु केली. नुकतेच एनसीबीने या प्रकरणात आणखी एका ड्रग्ज तस्कराला वर्सोवा-अंधेरी भागातून अटक केली आहे.

मुंबईतील अंधेरी परिसरात एनसीबीने छापेमारी केली आहे. त्यावेळी भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांच्या घरावरही ड्रग्ज प्रकरणात छापेमारी केली. या छापेमारीतून एनसीबीने ड्रग्ज जप्त केले आहे. या दोघांवर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप केला आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे.

काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणात अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांची देखील चौकशी केली होती. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.

यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंहसह अनेक कलाकारांची देखील एनसीबीने चौकशी केली आहे.