मुंबई - 'मेहंदी' फेम अभिनेता फराज खानचे आज वयाच्या 46व्या वर्षी निधन झाले. फराज मागील अनेक दिवसांपासून आजारी होता. बंगळुरुच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. फराज दिर्घकाळापासून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर या आजाराशी झुंज देत होता.

फराज खानच्या निधनाचे वृत्त देताना अभिनेत्री पुजा भट्टने असे म्हटले आहे की, 'मी खूप जड अंत:करणाने ही बातमी शेअर करत आहे की फराझ खान आता आपल्यात नाही. त्याला जेव्हा सर्वाधिक गरज होती त्यावेळी आपण सगळे मदत करण्यासाठी पुढे आलात. आता त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा.'

दरम्यान फराज खानला सलमान खान दीर्घकाळापासून मदत करत होता. बेंगळुरूतील विक्रम हॉस्पिटलमध्ये फराजवर उपचार सुरू होते, तेव्हा सलमानने त्याच्या सर्व मेडिकल बिल्सचा खर्च दिला होता. विनोदवीर कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाहने याबबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

फराज खानने अभिनेत्री राणी मुखर्जीबरोबर मेहंदी, दुल्हन बनू मै तेरी, फरेब या सिनेमांसह अनेक सिनेमांत काम केले होते. फरेबमधील त्याचे 'तेरी आंखें झुकी झुकी' हे गाणे लोकप्रिय झाले होते.