रायगड : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमधील सेटला भीषण आग लागली. एनडी स्टुडिओमधील ‘जोधा अकबर’ चित्रपटासाठी बनवण्यात आलेला किल्ल्याचा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

‘जोधा अकबर’च्या किल्ल्याचा सेट
रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील चौक येथून कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावर नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ आहे. या ठिकाणी शूटिंगसाठी उभारलेल्या किल्ल्याच्या पाठीमागे आग लागून सेट जळाला. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने धुरांचे लोट तीन ते चार किलोमीटर अंतरावरुनही दिसत होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कर्जत नगरपालिकेचे फायर ब्रिगेड अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होत्या.

एनडी स्टुडिओच्या पाठीमागील बाजूला मोठ्या प्रमाणात सुकलेले गवत वणव्यामुळे पेटले. त्याची वेळीच दखल न घेतल्याने स्टुडिओच्या आतील भागातील गवत जळत जोधा अकबर चित्रपटासाठी बनवण्यात आलेल्या किल्ल्याच्या सेटपर्यंत आग पोहोचली. त्यात सेटच्या काही भाग जळाला आहे.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘जोधा अकबर’ हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेता हृतिक रोशन यामध्ये अकबराच्या तर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जोधाबाईंच्या मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू केली होती.