मुंबई - सुशांत सिंह प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. यापूर्वी एम्सने सुशांतने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले होते. आता ईडीने सुशांतच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंगचे पुरावे मिळाले नसल्याचे सांगितले आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, सुशांतच्या कुटुंबियांनी गैरसमजातून मनी लाँड्रिंगचे आरोप लावले आहेत.

सुशांतच्या कुटुंबियांनी, रिया चक्रवर्तीने त्यांच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये बळकावल्याचा आरोप केला होता. परंतु ईडीच्या तपासात रियाच्या विरोधात काहीच संशयास्पद आढळले नाही.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, ईडीच्या सूत्रांनी सांगितले, सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या जमा रक्कम आणि संपत्तीबद्दल जास्त काही माहित नव्हते. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात घोटाळा झाल्याचा त्यांना संशय होता. परंतु खात्यातून छोट्या-मोठ्या झालेल्या ट्रान्जेक्शनची माहिती घेतली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या बँक खात्यातून 2 कोटी 78 लाख रुपये टॅक्स देण्यात आला होता. रिया चक्रवर्तीच्या खात्यात सुशांतच्या खात्यातून एखाद्या मोठ्या रक्कमेचे थेट ट्रान्जेक्शन झालेले नाही, अशीही माहिती समोर आली. दोघांमध्ये छोटे-मोठे व्यवहार झाले असावेत.

रिया विरुद्ध झाली होती मनी लाँड्रिंगची केस...
31 जुलैला ईडीने सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांच्या पटनामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारे रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, वडील इंद्रजीत, आई संध्या, सुशांतचे हाऊस मॅनेजर सॅम्युअर मिरांडा आणि मॅनेजर श्रुती मोदी विरुद्ध मनी लाँड्रिंगची तक्रार दाखल केली होती. केके सिंह यांनी सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींची गडबड झाल्याचा आरोप लावला होता. या प्रकरणी ईडीने जवळपास 24 लोकांची चौकशी केली होती.