मुंबई - बॉलिवूडचा प्रसिध्द गायक सोनू निगम नेहमीच आपल्या विधनांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचे 'ईश्वर का सच्चा बंदा' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याच्या प्रमोशन दरम्यान सोनू निगमने एका वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आपल्या मुलाने गायक होऊ नये आणि गायक झाला तर भारतात काम करू नये, असे सोनू निगम म्हणाला. त्याच्या या वक्तव्याने भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सोनू निगमचा मुलगा निवान सध्या दुबईत वास्तव्यास आहे. त्याच्या करिअर बाबत सोनू म्हणाला, 'माझ्या मुलाला मी गायक करणार नाही. किमान भारतात तरी त्याने काम करु नये, अशी माझी इच्छा आहे.' सोनू निगमच्या या अजब वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सोनू निगम आणि मुलगा निवान

एका प्रसिद्ध इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सोनूने आपल्या मुलगा निवान विषयी सांगताना म्हणाला, 'खरे सांगायचे झाले तर त्याने व्यवसायिक गायक होऊ नये, अशी माझी इच्छा आहे, आणि व्हायचेच असेल तर, त्याने भारतात काम करु नये असे, मला वाटते. तो भारतात राहत नाही. तो सध्या दुबईत आहे. त्याने तिथेच करिअर करावे असे वाटते. त्याला गाण्याची आवड आहे. तो देखील खूप छान गातो. पण, त्याला गाण्यापेक्षा अधिक गेमिंगची आवड आहे. दुबईतल्या टॉप गेमर्समध्ये त्याची गणना होते. मला वाटते त्याने आपले करिअर निवडले आहे. पण त्याने काय करावे आणि काय करु नये ही मते मी त्याच्यावर लादू शकत नाही.'