मुंबई - बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' या शोमधील आपल्या सूत्रसंचालनामुळे नेहमीच चर्चेत असतात. केबीसीच्या निमित्ताने चाहत्यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळत असते. मात्र या शोमुळे अमिताभ वादात सापडले आहेत. शोदरम्यान विचारलेल्या एका प्रश्नावर आक्षेप घेत सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी अमिताभ बच्चन यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हिंदू धर्मीय लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करून त्यांनी लातूर पोलिस अधिक्षकांकडे तक्रार दिली आहे.

३० ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमाच्या एका भागात बेजवाडा विल्सन आणि अनुप सोनी यांना २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अनुयायांनी कोणता धर्म ग्रंथ जाळला होता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला विष्णुपुराण, भगवत गीता, ऋग्वेद आणि मनुस्मृती हे पर्याय देण्यात आले होते.

यावर आक्षेप घेत अभिमन्यू पवार म्हणाले, 'आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले. अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसंच जवळपास शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा खोडसाळ प्रयत्न लपून राहत नाही.'

'हिंदू धर्म हा अत्यंत सर्जनशील व सर्वसमावेशक धर्म आहे. काळसुसंगत अनेक चांगले बदल आत्मसात करून हिंदू धर्म समृद्ध बनलेला आहे. ढोंग घेतलेले अनेक तथाकथित बुद्धीजीवी आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून नित्यनेमाने सहिष्णू हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावत असतात. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारण्यात आलेला प्रश्न हा त्याच विघातक प्रयत्नांचा भाग असून दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही,' असे त्यांनी सांगितले आहे.

'या प्रकरणी लातूर पोलिस अधीक्षक यांच्याकडे मी लिखित तक्रार नोंदवली आहे. हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यातही प्रसारित झाल्याने लातूर पोलिस गुन्हा नोंदवू शकतात. लवकरच एफआरआय नोंदवला जाईल अशी अपेक्षा आहे,' असेही ते म्हणाले.

[removed][removed]