मुंबई - ड्रग्ज प्रकरणात आता अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावरही बंगळुरु पोलिसांनी धाड टाकली आहे. मुंबई स्थित त्यांच्या घरी पोलिसांनी दुपारी एक वाजता छापा मारला. पोलीस विवेकचा मेहूणा आदित्य अल्वाचा तपास करत आहेत. तो बंगळुरुतील ड्रग्ज कनेक्शनमध्ये आरोपी आहे.

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, कर्नाटकचे माजी मंत्री जीवाराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वाचा पोलीस अमली पदार्थ प्रकरणात शोध घेत आहेत. तो सध्या गायब असल्याने त्याच्या तपासासाठी बंगळुरु पोलिसांनी विवेक ओबेरॉयच्या घराचा तपास सुरु केला.

विवेक ओबेरॉयच्या पत्नीचा भाऊ आदित्य अल्वा हा हाय प्रोफाईल पार्ट्यामधील एक लोकप्रिय चेहरा आहे. ड्रग्ज कनेक्शनचा तपास सुरु झाल्यापासून आदित्य गायब झाला आहे. त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. आदित्य विवेकच्या घरात लपून बसल्याची माहिती बंगळुरु पोलिसांनी मिळाल्याने त्यांनी थेट विवेकचे घर गाठले.

पीटीआयच्या वृत्तानुसार, विवेक ओबेरॉय हा आदित्य अल्वाचा नातेवाईक आहे. आदित्य हा विवेकच्या घरी लपला असावा अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही न्यायालयातून वॉरंट मिळवले आणि केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने विवेकच्या घरात धाड टाकली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी देखील ड्रग्जचे सेवन करतात आणि देवाण-घेवाण करतात, हे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेकडून (सीसीबी) चौकशी सुरु करण्यात आली. यात अभिनेत्री रागिनी व्दिवेदीसह आणखी काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.