मुंबई : बॉलिवूडमधील 80 व 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि त्या काळातील सर्व बड्या कलाकारांसोबत काम करणार्‍या मीनाक्षी शेषाद्रीच्या अकाली मृत्यूच्या अफवा रविवारी संध्याकाळपासूनच वाऱ्यासारख्या पसरत होत्या. तिच्या निधनाबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकात कोरोनाच्या संसर्गामुळे तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. मात्र मीनाक्षी शेषाद्रीने स्वत: या अफवांना पूर्णविराम दिलाय. आपल्या मृत्यूच्या अफवांबाबत मीनाक्षी शेषाद्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ठणठणीत असल्याचे जाहीर केले आहे. 

अमेरिकेच्या डॅलास शहरात पती आणि दोन मुलांसोबत राहणारी मीनाक्षी शेषाद्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन एक फोटो शेअर केला आणि फक्त दोन शब्द लिहिलेय "डान्स पोज !". या दोन शब्दांच्या पोस्टमधून तिने आपल्या मृत्यूच्या सर्व अफवांना आळा घातलाय.

मीनाक्षीने 1983 साली पेंटर बाबू या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि त्यानंतर त्याच वर्षी रिलीज झालेल्या हिरो चित्रपटात ती झळकली. 1981 साली वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मीनाक्षीने 'मिस इंडिया' सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. सनी देओल सोबतचा 1996 साली आलेला घातक हा तिच्या अखेरचा सिनेमा आहे. तिने हरीश म्हैसूर नावाच्या एका इन्व्हेस्टमेंट बँकरशी लग्न केले आणि त्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. अनेक नृत्य प्रकारांमध्ये माहीर असलेल्या मीनाक्षी शेषाद्रीने अमेरिकेच्या टेक्सासमधील डॅलास शहरात डान्स स्कूल सुरु केले आहे.

[removed][removed]