मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रणधीर कपूर यांच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती रुग्णालयाकडून देण्यात आलेली नाही. रुग्णालयाकडून लवकरच अधिकृत हेल्थ अपडेट जाहीर केले जाणार आहे. सध्या रणधीर कपूर आणि त्यांची बहिण रीमा जैन हे राजीव कपूर यांच्या संपत्तीची कायदेशीर लढाई लढत आहेत.

इंडिया टाईम्सच्या अहवालानुसार, रुग्णालयातील अधिकाऱ्यांपैकी डॉ. संतोष शेट्टी म्हणाले की, ‘अभिनेता रणधीर कपूर यांना बुधवारी रात्री कोरोना उपचारासाठी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे.’ 

कपूर घराण्यावर गेल्या काही महिन्यांत दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. गेल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर या जगाला निरोप देऊन निघून गेले आणि अलीकडेच त्यांचे बंधू राजीव कपूर यांचेही 9 फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. ऋषी आणि राजीव यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ रणधीर कपूर अद्याप या धक्क्यातून बाहेर आलेले नाही. कपूर घराण्याच्या या पिढीचे रणधीर कपूर आणि त्याचा बहिण रीमा जैन हे दोघेच हयात आहेत.