मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता पुष्कर जोग याच्या मामांचे नुकतेच निधन झालेय. मामाचा फोन उचलू शकलो नाही, त्याला कॉलबॅक करायचा राहिला आणि दुसऱ्याच दिवशी मामा सोडून गेल्याची दुःखद बातमी कानी आली, असे सांगताना पुष्कर जोगच्या अश्रूंचा बांध फुटला. या कठीण काळात प्रियजनांच्या संपर्कात राहा, असे आवाहन पुष्करने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करून केले आहे. 

‘हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे, तेव्हा हेवेदावे, रुसवे-फुगवे, वैचारिक मतभेद सर्व काही कृपया बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक, मित्र परिवार आणि आप्त स्वकीयांच्या संपर्कात रहा. कॉल, मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका’, अशी कळकळीची विनंती देखील पुष्करने केलीये.

‘पाडव्याच्या दिवशी मला माझ्या गोव्याच्या मामाचा फोन आला. मला म्हणाला कसा आहेस, मुंबईची परिस्थिती कशी आहे, काळजी घे. नुकतीच माझी एक फिल्म रिलीज झाली होती. मी त्याला विचारले, मामा माझा सिनेमा कधी बघणार आहेस? तो म्हणाला माझ्याकडे ओटीटी चॅनेल नाही, मी म्हटले हरकत नाही मामा, दोन-तीन महिन्यांनंतर चॅनेलवर फिल्म येईल, तेव्हा तू बघ. त्यानंतर 21 एप्रिलला सकाळी 8 वाजता मामाचा मला परत फोन आला. मला लवकर उठायची सवय नसल्यामुळे मी त्याचा फोन उचलू शकलो नाही. त्याच दिवशी त्याला कॉलबॅक करायचा राहून गेले. 22 एप्रिलला, म्हणजे त्याच्याच दुसऱ्या दिवशी मला माझ्या कुटुंबाकडून समजले की, गोव्याचा सतीशमामा गेला’, असे सांगतानाच पुष्करला रडू कोसळले.

दरम्यान, आपण नेहमी, आपल्या मित्र, नातेवाईकांचा फोन येतो, तेव्हा म्हणतो, जाऊदे नंतर करु. असे नका करु, आता मिस्ड कॉल नको, कॉल बॅक करा, त्यांना विचारा, कसे आहात, सगळे व्यवस्थित आहे ना, त्यांना सांगा आम्ही आहोत, असे आवाहन पुष्करने चाहत्यांना केले आहे.

[removed][removed]