मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रातील पन्नासहून अधिक दिग्गजांशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संवाद साधला आहे. तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.
मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा आढावा राज ठाकरे यांनी घेतला. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी राज ठाकरे यांनी ‘झूम’ माध्यमातून संवाद साधलाय. यावेळी त्यांच्या समस्याही राज ठाकरेंनी जाणून घेतल्या.
काय आहेत कलाकारांच्या मागण्या काय?
महाराष्ट्रात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावे आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करावी अशा विविध मागण्या मांडल्या.
सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल या उपाययोजनांवरही चर्चा झाली. दीड तास चाललेल्या या ‘झूम’ संवादात राज ठाकरेंनी सर्व समस्या आणि मागण्या नोंदवून घेतल्या. यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असे आश्वासन त्यांनी दिलेय.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, मनसे नेते अमित ठाकरे, स्टार प्रवाह वाहिनीचे प्रमुख-दिग्दर्शक सतीश राजवाडे, निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे, निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेता दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री, अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेता सचित पाटील, संगीतकार राहुल रानडे आदींचा सामील झाले होते.
दोन दिवसात या विषयांवर कार्यवाही होऊ शकेल असा विश्वासही राज ठाकरेंनी व्यक्त केलाय. गरज भासल्यास असाच ‘झूम’ संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली.