मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत तिची बहीण रंगोलीला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स बजावला आहे. कंगणाला समन्स बजावत २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

वांद्रे कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून कंगना आणि तिच्या बहिणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी दोन वेळा या दोघींनाही चौकशीसाठी समन्स बजावले होते. यातील एका समन्सला उत्तर देताना त्यांनी घरात लग्न असल्याचे कारण दिले. तर दुसऱ्या समन्सला त्यांनी काहीच उत्तर दिले नव्हते. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून कंगणाला नवीन समन्स बजावण्यात आले आहे.

कंगना रानौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला होता, त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

दिग्दर्शक साहिल सय्यदने सर्वात आधी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मध्यंतरी कंगना रानौतने बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी टीका कंगना रानौतने केली होती.