मुंबई : बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर हिंसाचारात घडला. यात काही जणांचे मृत्यू झाले. नेहमीच वादग्रस्त विधनांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रानौतने आपल्या ट्विटर हँडलवरुन हिंसाचार करणाऱ्यांना हिंसाचारातून उत्तर द्यायला हवे असे वक्तव्य केले होते. हे विधान चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह असल्याने ट्विटरने कंगनाचे ट्विटर हँडल सस्पेन्ड केले आहे. यावर आता कंगना रानौतने एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिलीय.

कंगना रानौत म्हणाली की, "ट्विटरने हे पुन्हा सिद्ध केलेय की ते अमेरिकन आहेत आणि अमेरिकन लोक काळ्या (ब्राउन) लोकांना गुलाम बनवण्याच्या मानसिकतेने जन्माला आले आहेत. ते ठरवतात की आपण काय विचार करावा, काय बोलावे किंवा काय करावे. सुदैवाने माझ्याकडे आणखी काही प्लॅटफॉर्म आहेत, ज्याद्वारे मी आवाज उठवू शकते आणि माझ्या सिनेमाबद्दल बोलू शकते. ज्या लोकांवर अत्याचार होतात आणि जे दडपले जातात, त्यांना गुलाम म्हणून ठेवले जाते आणि ज्यांची अभिव्यक्ती दाबून टाकली आहे. एवढे असूनही त्यांच्या दु: खाचा अंत नाही, देशातील अशा लोकांसाठी माझे मन दुःखी आहे, "