मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे राज्यात थैमान घातले आहे. वाढती रुग्णसंख्या, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, सोयी-सुविधा, औषधोपचार यासर्व गोष्टींचा सरकारवर ताण आलाय. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तरावरुन मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यातच बॉलिवूडकरांनाही मदतीचा हात पुढे केलाय. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसह अनेक बॉलिवूडकरांना पुन्हा एकदा कोरोनाबाधितांना मदत करण्याचा निर्णय घेतलाय. 

शिवाजी पार्कमध्ये कोविड सेंटर सुरु... 
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारले जात आहे. मुंबईतील दादर परिसरात कोरोना बाधितांवर उपचार व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील मुंबई महानगरपालिकेने कोविड एचडीयू रुग्णालय उभारले आहे. शिवाजी पार्कमधील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये 20 रुग्‍णशय्या क्षमतेचे रुग्णालय आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी अजय देवगण मदत करतो आहे.

या रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सपोर्ट आणि इतर सुविधांचा समावेश असेल. या कोविड सेंटरसाठी अजय देवगण त्याची एनवाय फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणार आहे. नुकतेच एनवाय फाऊंडेशनने सामाजिक उत्‍तरदायित्व म्‍हणून 1 कोटी रुपयांची देणगी महानगरपालिकेकडे सुपूर्द केलीये.