मुंबई : बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना रानौतच्या बॉडीगार्डला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. कंगनाचा बॉडीगार्ड कुमार हेगडेवर वर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात नोंदविला आहे. एका मेकअप आर्टिस्टने हे आरोप केले आहेत. हेगडेला त्याच्या गावातून अटक केली आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले, मुंबई पोलिसांच्या एका टीमने शनिवारी कुमार हेगडेला मंड्याच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे. त्याने पीडित महिलेशी संपर्क तोडला होता. यामुळे त्या महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याने तिच्याकडून 50 हजार रुपये घेतले, परंतू परत केले नसल्याचा आरोपही तिने केलाय. 

या 30 वर्षांच्या ब्यूटीशियनने कंगनाच्या बॉडीगार्डवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. गेल्या वर्षी जूनमध्ये ती एका सिनेमाच्या शुटिंगवेळी कुमार हेगडेला भेटली होती. तिच्या तक्रारीनुसार कुमार हेगडेने तिला लग्नासाठी विचारणा केली होती. यानंतर तिला त्याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सांगितले. तो तिच्याशी लग्न करणार असल्याने ती यास तयार झाली. एकत्र राहताना तिने हेगडेला शरिरसंबंध ठेवण्यास नकार दिला, परंतू त्याने तिला ते करण्यास बळी पाडले. तसेच त्याने काही दिवसांपूर्वी आईची तब्येत खराब असल्याचे सांगून तिच्याकडून 50 हजार रुपये घेतले आणि तेव्हापासून तो तिच्या संपर्कात नव्हता.