नवी दिल्ली : अयोध्या येथे राम मंदिर उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट स्थापन केली आहे. या ट्रस्टने मंदिरासाठी जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या व्यवहारावरून आता वाद उफाळला आहे. आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी कागदपञे दाखवत ट्रस्ट सचिव चंपत राय यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहे. तर समाजवादी पार्टीचे नेते आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनीही जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेली जमीन अवघ्या काही मिनिटांत दोन कोटींवरून १८.५ कोटींना खरेदी केल्याचे म्हटले आहे. हे सर्व आरोप ट्रस्टने फेटाळून लावले असून त्यावर ट्रस्टने खुलासा देखील  केला आहे.
खासदार संजय सिंह आणि माजी आमदार पवन पांडे यांनी राम मंदिर जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी यावर आपली भूमिका मांडलेली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिरासाठी कमीत कमी दराने जमीन खरेदी केली आहे. काही राजकीय नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. आरोप करणारे लोक राजकारशी संबंधित असून, राजकीय द्वेषातून आरोप करत आहेत. हे समाजाची दिशाभूल करण्यासाठी केली जात आहे, असे ते म्हणाले.
९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरासंदर्भातील मुद्द्यावर निकाल दिल्यानंतर देशभरातून लोक अयोध्येत जमीन खरेदीसाठी येऊ लागले. त्यामुळे जमिनीचे भाव वाढले. ज्या प्लॉटची माध्यमांमध्ये चर्चा होत आहे, ती जागा रेल्वे स्थानक परिसराजवळ असलेली मोक्याची जागा आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट मंदिरासाठी आतापर्यंत जी जमीन खरेदी केली, कमीत कमी किंमतीत खरेदी केली आहे, असे राय यांनी म्हटले आहे. समंती घेण्यात आल्यानंतर संबंधित कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. सर्व प्रकारची कोर्ट फीस आणि स्टॅम्प पेपर सर्व ऑनलाईन खरेदी केले जात आहे. जमिनीची खरेदी समंती पत्राच्या आधारावरच केली जात आहे. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे जमिनीचा मोबदला विक्रेत्याच्या खात्यावर ऑनलाइन जमा केला जातो, असे राय यांनी म्हटलेले आहे.