नवी दिल्ली : देशाच्या राजधानी दिल्लीतून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केल्याची माहिती समोर येते आहे. तो ओळख लपवून १५ वर्षांपासून दिल्लीच्या लक्ष्मी नगर भागात राहत असल्याची माहिती मिळते आहे. सखोल तपासादरम्यान, त्याच्याकडून एके -४७ रायफल जप्त करण्यात आलेली आहे. मोहम्मद अशरफ अली असे या दहशतवाद्याचे नाव असून तो मौलाना म्हणून भारतात राहत होता.
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सोमवारी ही कारवाई केली आहे. दहशतवाद्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. या दहशतवाद्याने ही शस्त्रे वाळूमध्ये लपवून ठेवली होती. पोलीस उपायुक्त प्रमोद सिंग कुशवाह यांनी याबाबत अशी माहिती दिली की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारा मोहम्मद अशरफ उर्फ ​​अली याने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय ओळखपत्र मिळवले होते. तो भारतीय नागरिक म्हणून दिल्लीत राहत होता. त्याच्याकडून एके -४७ रायफल, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना स्वतः विशेष कक्षाच्या कारवाईवर लक्ष ठेवून होते. 
या प्रकरणाची अधिक माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, एक दहशतवादी लक्ष्मी नगरमध्ये लपला आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. येत्या काही दिवसात काहीतरी मोठी कारवाई करू शकतो. या माहितीच्या आधारे, छापे टाकण्यात आले आणि अलीला सोमवारी रात्री १०च्या सुमारास त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
------------