वाराणसी - दिल्लीत पंजाब-हरियाणाचे शेतकरी मागील ५ दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. केंद्र सरकारने या आंदोलकांना चर्चेचे आवाहन केले, परंतु अद्याप शेतकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. देव दीपावली निमित्त पंतप्रधान मोदी आज वाराणसीमध्ये आहेत.

केंद्राच्या कृषी कायद्याचे समर्थन करताना मोदी यांनी त्याबद्दल माहिती दिली. नव्या कृषी कायद्यांत पर्याय देण्यात आले आहेत. आधी आडतीच्या बाहेर होणारा व्यवहार बेकायदेशीर मानला जात होता. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. कारण, ते आडतीपर्यंतही पोहोचू शकत नव्हते. मात्र आता छोट्या शेतकऱ्यांसाठी पर्याय दिला आहेत. अशा स्थितीतही कुणाला जुन्या पद्धतीचाच व्यापार योग्य वाटत असेल, तर तो पर्याय बंद केलेला नाही, असे मोदी म्हणाले.

कृषी कायद्यांतील बदलांचा निर्णय तर योग्य आहे, पण त्यामुळे पुढे जाऊन परिणाम भोगावे लागतील, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण केली जात आहे. जे आतापर्यंत झाले नाही, जे कधी होणार नाही, त्यावरुन समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप मोदींनी विरोधकांवर केला. नव्या कृषी कायद्याबाबतही हेच घडत आहे आणि हे तेच लोक आहेत ज्यांनी अनेक दशक शेतकऱ्यांचा छळ केलाय, अशी टीका मोदींनी काँग्रेसचे नाव न घेता केली.