नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. अखेर आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून सायंकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे, अशी माहिती मिळत आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होईल. मात्र, भाजपाने स्वःपक्षातील नेत्यांसह मित्र पक्षातील काही नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतलेले आहे. त्यामुळे दिल्लीत दाखल झालेल्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे निश्चित मानले जात आहे. यात महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश आहे. भाजपाचे नेते नारायण राणे यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होते. त्यांनाही दिल्लीत बोलावले असून, ते मंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच त्यांच्याकडे देण्यात येणारे खातेही निश्चित झालेले आहे, असे वृत्त समोर येत आहे. 
नारायण राणे यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपद देण्यात येणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. यापूर्वी हे मंत्रीपद शिवसेनेकडे होते अन् आता नारायण राणे यांच्याकडे देण्यात येणार आहे.  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आल्यापासून शिवसेनेला हे मंत्रिपद देण्यात आले होते. मोदी यांच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचे काम बघितले होते. त्यानंतर दुसऱ्या कार्यकाळात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योगमंत्री पद सोपवण्यात आलं होतं. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर अरविंद सावंत यांनी या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रकाश जावडेकर यांच्याकडे या खात्याचा पदभार देण्यात आलेला आहे. आता नारायण राणे यांच्याकडे अवजड उद्योग खात्याची सूत्रं दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेबरोबरच भाजपाने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.