नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या नगरोटा येथे गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदच्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. नगरोटा येथे झालेल्या चकमकी संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, एनएसए अजित डोभाल, परराष्ट्र सचिव आणि सर्व गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

२६/११ च्या वर्षपूर्ती दिनानिमित्त दहशतवादी मोठे षडयंत्र राबवण्याच्या तयारीत होते. हे अतिरेकी तिथे मारले गेले नसते तर देशात त्यांनी हाहाकार उडवला असता, असा गौप्यस्फोट या बैठकीत करण्यात आला. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अतिरेकी सीमेपलीकडून भारतावर मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने आले होते. २६/११ च्याच दिवशी पुन्हा एकदा तशीच खळबळ उडवून देण्याचा त्यांचा प्लॅन होता. सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे तो उद्ध्वस्त झाला.

जम्मूच्या नगरोटामध्ये सुरक्षा रक्षकांनी जैशच्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मूहून श्रीनगरकडे ट्रकमध्ये दारूगोळा घेऊन चार दहशतवादी निघाले होते. या घटनेची माहिती सुरक्षादलाला मिळाताच, नगरोटा येथील टोलनाक्यावर ही ट्रक अडवण्यात आली. या दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी आत्मसमर्पण करण्याचे सांगितले होते. मात्र, दहशतवाद्यांनी उलट सुरक्षादलांवर ग्रेनेडचा हल्ला केला. यानंतर भारतीय सुरक्षादलांनी दहशतवाद्यांचा ट्रक उडवून दिला. या घटनेत चार दहशतवाद्यांचा खात्मा असून या स्फोटात दहशतवाद्यांच्या एके ४७ रायफल जळाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरूवारी सकाळी ४.३० वाजता ही चकमक सुरू झाली होती. तब्बल दोन तास ही चकमक सुरू होती. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षादलांना यश आले आहे. हे खात्मा केलेले चारही दहशतवादी जैशचे असल्याचे वृत्त आहे. ट्रकमध्ये स्फोटकांबरोबरच धान्याची पोती असल्याची माहिती मिळते. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्गावर बंद करून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

या संदर्भात टि्वट करून पंतप्रधान मोदींनी सुरक्षा दलाचे कौतुक केले आहे. मोदी म्हणाले, 'आमच्या सुरक्षा दलाने पुन्हा एकदा महान शौर्य दाखवले. त्यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कट उधळण्यात यश आले आहे.पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित ४ दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे-स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.'