नवी दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचाराचे संपूर्ण देशभरात रोष व्यक्त होत असताना भाजपा नेत्यांनी मात्र यावर मौन बाळगले आहे. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांची हत्या होणे निंदनीय आहे, मात्र अशा प्रकारचे अनेक मुद्दे देशातील इतर भागातही असून वेळीच उपस्थित करत त्यांच्यावरही समान पद्धतीने भाष्य केले पाहिजे असे मत मंत्री निर्मला सीतारमन यांनी व्यक्त केले आहे.
मंञी सीतारमन पुढे म्हणाल्या की, अशा घटना घडतील तेव्हा त्या उपस्थित केल्या पाहिजेत असे सांगताना फक्त तिथे भाजपाचे सरकार आहे म्हणून जेव्हा योग्य वाटेल तेव्हा नाही असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. निर्मला सीतारमन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्या आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या अटकेसंबंधी विचारण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच इतर वरिष्ठ नेत्यांकडून लखीमपूर हिंसाचारावर मौन का बाळगले आहे? तसेच कोणी अशा घटनांबद्दल प्रश्न विचारल्यानतंर बचावात्मक प्रतिक्रिया का दिली जाते? असे विचारण्यात आले. यावर उत्तर देताना मंञी सीतारमन यांनी सांगितले की, नाही…नक्कीच नाही. बले झाले तुम्ही अशा एका घटनेचा उल्लेख केलात जी निषेधार्ह आहे. आमच्यातील प्रत्येकाचे हेच मत आहे. अशा प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडत असून तो माझ्या काळजीचा विषय आहे, असे मत मंञी सीतारमन यांनी व्यक्त केले आहे.