उत्तर प्रदेश - हाथरसमध्ये 20 वर्षीय मुलीवर झालेल्या समूहिक बलात्कार घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. आरोपींनी मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिच्या पाठीचे हाड मोडले, तिला आरोपींची नाव सांगता येऊ नये म्हणून तिची जीभ कापली, तिच्या मानेचेही हाड मोडले होते. उपचारादरम्यान तिचा 29 सप्टेंबरला मृत्यू झाला. याच दिवशी रात्री पोलिसांनी गुपचुप पीडितेचा अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. विनंती करूनही पोलिसांनी मुलीचे अंत्यदर्शन घेऊ दिले नाही.

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरु होते. परंतु मंगळवारी तिची प्राणज्योत मालावली. उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्री 12.45 वाजता पीडितेचा मृतदेह हाथरसमध्ये आणला. पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांवर त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केल्याचा आणि त्यांना गावात येण्यापासून रोखल्याचा आरोप लावला आहे.

विधीवत तिच्यावर अंत्यसंस्कार करता यावे, म्हणून आम्ही नाही म्हणत असतानादेखील त्यांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचे पीडितेच्या भावाने सांगितले. पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे विनंती करूनही मुलीचा मृतदेह कुटुबियांत्या ताब्यात देण्यात आला नाही. पोलिसांना सर्वांना नकार देत 200 पोलिसांच्या ताफ्यासह पीडितेचा मृतदेह थेट स्मशानभूमित नेण्यात आला.

पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे, ऐकून न घेता मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास पीडितेचे अंत्यसंस्कार उरकले. अंत्यसंस्कारावेळी देखील पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना स्मशानभूमित येण्यास विरोध केला. परंतु पीडित मुलीचे तिच्या कुटुंबियांच्या सहमतीने अंत्यसंस्कार झाल्याने सांगत पोलिसांनी आरोप फेटाळून लावले.