रोहतक - मेन इन इंडिया कोरोना लस कोव्हॅक्सीन क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. आतापर्यंतच्या दोन टप्प्यातील ट्रायलमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होत होता. परंतु तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये पहिल्यांदा भारतातील मंत्रीही सहभागी झाले आहेत. देशात पहिल्यांदाच एका मंत्र्यांने कोरोनाची लस घेतली आहे.

हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी अंबालातील सिव्हिल रुग्णालयात कोरोनाची ही लस घेतली आहे. आपण कोव्हॅक्सीन परिक्षणातील व्हॅलिंटिअर म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीत सर्वप्रमथ लस टोचून घेऊ, असे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी यापूर्वीच जाहिर केले होते. हरियाणामध्ये आजपासून कोव्हॅक्सिन लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू झाले आहे.

भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तयार केलेली ही लस आहे. या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. सुरुवातीला ही लस पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याआधीच ही लस लाँच केली जाणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य रजनी कांत यांनी याआधी दिली होती.

या लसीचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परिक्षण आणि विश्लेषण पूर्ण झाले असून यशस्वी ठरले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरु केले आहे. मानवी चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील जवळपास एक हजार व्हॅलंटिअर्सना ही लस दिली होती. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतातील एकूण २५ केंद्रांवर २६ हजार लोकांवर केली जाणार आहे.