इस्लामाबाद : मुंबई हल्ल्यामागचा (26/11) मुख्य सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानच्या अँटी टेररिज्म कोर्टाने अवैध फंडिंग प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी मीडियाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी आणि त्यामधील सहभागामुळे लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हाफिज सईदसोबत आणखी दोन आरोपी प्रो. जफर इकबाल आणि याह्या मुजाहिदला दोन प्रकरणात पाच-पाच वर्षांची आणि इतर एका प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच त्यांना 1,10,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यासोबतच, त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली येणार आहे.
हाफिजला याआधी फेब्रुवारीमध्ये लाहौरच्या एका न्यायालयाने टेरर फंडिंगच्या दोन प्रकरणात दोषी ठरवले आहे. तेव्हा कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याच्याविरोधात दहशतवादी फंडिंग, मनी लॉन्ड्रिंगसह 41 गुन्हा दाखल आहेत.