नवी दिल्ली :  केंद्राच्या नव्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसेच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यादरम्यान भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला असून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशाराही दिला आहे. केंद्र सरकारने जर आमच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या नाही, तर आम्ही मोठी ट्रॅक्टर रॅली काढणार आहे, असे टिकैत म्हणाले आहे. 
टिकैत पुढे म्हणाले की, "आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिला आहे. जर त्यांनी आमचे ऐकले नाही, तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली काढणार आहोत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आम्ही प्रवास करू. येथील आंदोलनदेखील सुरु राहणार. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही," असे राकेश टिकैत यांनी एएनआयशी बोलताना सांगितले आहे. झारखंडचे कृषीमंञी बादल पारेख यांनी गाझीपूर सीमेवर भेट घेतल्यानंतर राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केले आहे. 
भारतीय किसान युनिअनने नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करणार आहे. आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन ही मोहीम राबवणार आहे, असे राकेश टिकैत  यांनी स्पष्ट केले आहे. तसेच "जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत घरी जाणार नाही, असा नारा राकेश टिकैत यांनी दिला आहे. 
देशभर ६ फेब्रुवारीला चक्का जाम आंदोलन : ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी ही घोषणा केली आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत राज्य तसेच राष्ट्रीय महामार्ग रोखले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.