लाहौल - हिमाचल प्रदेशातील लाहौल खोऱ्यातील थोरंग गावात एक व्यक्ती सोडून इतर सर्वजणांना कोरोनाची लागण झाली आहे. मनाली-लेह महामार्गावर असलेल्या थोरंग गावात केवळ ४२ लोक राहतात. ज्यावेळी या गावातील लोकांची कोरोनाची चाचणी केली तेव्हा गावातील ४२ पैकी ४१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लाहौल-स्पिती हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा ठरला आहे.

लाहौलमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना पर्यटकांना बंदी घातली आहे. रोहतांग बोगद्याच्या उत्तरेकडील बाजूस हा सर्व प्रदेश आहे. हिवाळा सुरु झाल्याने अनेकजण कुलूला फिरण्यासाठी येत आहेत. या भागात पर्यटकांची संख्या वाढल्याने गावातील सर्वच नागरिकांनी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. परंतु चाचणीचा निकाल पाहून नागरिकांसह प्रशासनाला धक्काच बसला. गावातील ४२ पैकी ४१ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून भूषण ठाकूर या एकमेव व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ही आला आहे. भूषण यांच्या कुटुंबातील पाच जणांना करोनाची लागण झाल्याने भूषणच क्वारंटाइन झाल्याप्रमाणे एकटे राहत आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका धार्मिक कार्यक्रमासाठी काही दिवासंपूर्वी गावातील सर्व लोक एकत्र आले होते. त्यामुळेच गावातील सर्वांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी २८ ऑक्टोबर रोजी स्पितीमधीलच रंगरिक गावातील ३९ नागरिक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. यावेळी खबरदारी म्हणून अधिकाऱ्यांनी गावाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या.