नवी दिल्ली - दिल्लीत कोरोनाचा कहर झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोनाच्या लसीबाबत महत्वाचे विधान केले आहे.

पुढील तीन ते चार महिन्यांत कोरोनावरील लस तयार होईल, असा मला विश्वास आहे. १३५ कोटी भारतीयांना ही लस पुरविण्याचा प्राधान्य क्रम वैज्ञानिक मूल्यांकनावर निर्धारित केला जाईल, असेही केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणाले. फिक्की एफएलओच्या एक वेबिनारमध्ये ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

'पुढच्या तीन ते चार महिन्यांत कोरोनावरील लस तयार होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. वैज्ञानिक डाटाच्या आधारावर कोणाला प्राधान्य द्यायचे त्याचा आराखडा ठरविला जाणार आहे. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, कोरोना योद्ध्यांना सहाजिकच प्राधान्य मिळेल, त्या खालोखाल वयोवृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तींना प्राधान्य मिळू शकते. आम्ही याबाबत सविस्तर योजना तयार केली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ती पोहोचवण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. २०२१ आपल्या सर्वांसाठी चांगले वर्ष ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. जुलै-ऑगस्ट २०२१ मध्ये २५ ते ३० कोटी लोकांसाठी कोरोना लसीचे ४० ते ५० कोटी डोस उपलब्ध झालेले असतील.' असे त्यांनी सांगितले आहे.

मागील ११ महिन्यांच्या कामांचा पाढा वाचताना हर्ष वर्धन म्हणाले, 'कोरोनाच्या लढाईत सरकार अत्यंत सक्रीय होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विमानतळे, बंदरे आणि जमिनी सीमांवर लक्ष ठेवण्यात आले. अत्यंत कमी वेळेत कोरोना महामारीच्या प्रकोपाला नियंत्रित करणाऱ्या काही मोजक्या देशांत भारतही आहे. सुरुवातीच्या काळात आपल्याला पीपीई किट, व्हेंटीलेटर्स आणि एन-९५ मास्कमी कमतरता भासली, परंतु काही महिन्यांतच आपण या गोष्टी जगातील काही देशांना निर्यात करण्यास सक्षम झालो.'