नवी दिल्ली  : देशातील काही राज्यांनी स्थानिक पातळीवर कोरोनासंदर्भातले निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तर काही राज्यांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर मागील २४ तासांमधे देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटल्याचे समोर आलेले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत ४१ हजार ६४९ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शुक्रवारी हाच आकडा ४४ हजार २३० इतका होता. त्यासोबतच देशात मागील २४ तासांत ३७ हजार २९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची आजपर्यंतची आकडेवारी आता ३ कोटी ७ लाख ८१ हजार २६३ इतकी झाली आहे.
नवीन सापडलेल्या ४१ हजार ६४९ कोरोनाबाधितांमुळे आता भारतात आजपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांचा आकडा ३ कोटी १६ लाख १३ हजार ९९३ इतका झाला आहे. मात्र, त्यापैकी आजघडीला फक्त ४ लाख ८ हजार ९२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ५९३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ४ लाख २३ हजार ८१० इतका झाला आहे. मात्र, देशपातळीवर गेल्या काही दिवसांमध्ये मृतांच्या आकड्यांमध्ये झालेली घट पाहाता हा काही प्रमाणात आरोग्य यंत्रणांसाठी दिलासा मानला जात आहे.