नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज दुपारी २ वाजता १२ वीचा निकाल घोषीत केलेला आहे. बारावीचे निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर करावेत, असे आदेशच यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात सीबीएसईने एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती. ज्यामध्ये याच आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते.यावर्षी कोरोनाच्या महामारीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पण, यावर्षी टॉपर्सची गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. यावेळी एकूण १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय विद्यालयातील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावेळीच्या १२ वीच्या निकालामध्ये १ लाख ५० हजार १५२ विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळवले आहेत. तर ७० हजार ४ विद्यार्थी ९५ टक्क्यांहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी बरीच सुधारली आहे. २०२० मध्ये, ८८.७८ टक्के विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.