नवी दिल्ली : तीन कृषि कायद्यांविरोधात सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता आणखी आक्रमक झालेले आहे.  आज संयुक्त किसान मोर्चाने देशभर रेल्वे रोकोचे आंदोलन पुकारले आहे. आज देशभरात सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रेल्वे रुळांवर धरणे प्रदर्शन करत ट्रेन रोखल्या जाईल, असे सांगण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये 144 अंतर्गत संचारबंदीची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले, हे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण देशातील लोकांना माहिती आहे की, आपल्याला रेल्वे कुठे रोखायची आहे. भारत सरकारने आमच्याशी या संदर्भात अद्याप काहीही चर्चा केलेली नाही.
शेतकरी नेते गुरमान सिंह चढूनी यांनी आवाहन केले आहे की, शेतकरी बांधवांनी स्टेशन्सच्या जवळ जाऊन ट्रेन्स रोखाव्यात. त्यांनी सांगितले की, तीन कृषि कायद्यांना रद्द करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदा, आणि लखीमपूर खिरी हत्याकांड प्रकरणी गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या अटकेच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलन पुकारले आहे.