वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. मोदींच्या दौऱ्यापूर्वीच मैदागिन चौकात उभारलेल्या काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


आज सोमवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला काळी शाई फासल्याचे समोर आला. या घटनेची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळताच त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी लवकरात लवकर दोषींना पकडण्याची विनंती काँग्रेस नेते राघवेंद्र चौबे यांनी केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मूर्तीची साफसफाई केली आहे. तसेच मूर्तीला फुलमाळाही चढवण्यात आल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती एका वृत्तपञाने दिली आहे.