नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. देशात विक्रमी रुग्णवाढ होत असून, रुग्णांचे बेड्सह इतर आरोग्य सुविधेंच्या अभावाने रुग्णांचे हाल होत आहे. या परिस्थितीमुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनच्या चर्चेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केलेय.

अमित शहा यांनी टाइम्स नाऊ वृत्तवाहिनाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कोरोनासह देशातील विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारची भूमिका मांडली. कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत केंद्राच्या भूमिकेबद्दल शहा यांना प्रश्न विचारला. त्यावर शहा म्हणाले,”केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वीच राज्यांना स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत. लॉकडाऊनसारखे उपाय राज्यांना आपापल्या पातळीवर घ्यावे लागतील, कारण विविध राज्यांतील परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे राज्यांनीच स्वतः निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेणे योग्य राहिल. गेल्या वर्षी लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्राने कोरोनाशी लढा देण्यासाठी मुलभूत सुविधा उभारल्यात,” असे सांगून शहा यांनी देशभरात लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावली.

केंद्राने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरून लक्ष हटवल्याच्या आरोपावर अमित शहा म्हणाले,”असे म्हणणे चुकीचे आहे. कोरोनाविरोधी लढ्यात केंद्र कुठेही कमजोर पडलेले नाही. कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळणाऱ्या देशांत भारताचाही समावेश आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. तसेच, मृत्यूदरही कमी आहे. दुसरी लाट फक्त भारतातच नाही, तर उतर देशांत आली आहे. कोरोनाविरोधी लढाईलाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम आहे.” 

“कुंभ असो किंवा रमजान असो कुठेही कोरोनासंदर्भातील नियम पाळल्याचे दिसून आलेले नाही. असे निष्काळजीपणाने वागणे चुकीचे आहे. त्यामुळेच आम्ही आवाहन केले आणि आता कुंभमेळा प्रातिनिधिक पद्धतीने साजरा करावा. ज्या वेगाने कोरोनाचा प्रसार होतोय, त्यामुळे अडचणी निर्माण होऊन परिस्थिती अतिगंभीर होऊ शकते. मात्र या दुसऱ्या लाटेविरोधातील लढाई आपण जिंकू असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे,” असेही शहांनी स्पष्ट केले.