तामिळनाडू - केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात निवडणूकीच्या दृष्टीकोनातून हालचाली वाढल्या आहेत. अशातच पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये अभिनेते रजनीकांत निवडणूक लढवणार का? याबाबत आज (३० नोव्हेंबर) रजनीकांत तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ साठी आपल्या राजकीय इनिंगबाबत मोठी घोषणा करू शकतात. आज (३० नोव्हेंबर) अभिनेता रजनीकांत यांनी त्यांच्या 'रजनी मक्कल मंद्रम' या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तमिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी रजनीकांत राजकारणाच्या रिंगणात उतरण्याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. अशातच रजनीकांत विधानसभा निवडणुका लढवू शकतात, असे संकेत त्यांच्या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. यात म्हटले की, 'ते आधी रजनी मक्कल मंद्रमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय घेतील.'

२०२१ मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. रजनीकांत यांच्या या बैठकीवर तामिळनाडूमधील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर रजनीकांत विधानसभा निवडणुका लढवणार की, नाही याबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत, असे सांगितले जात आहे.

गेली दोन वर्षे रजनीकांत राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतपणे त्यांनी अद्याप राजकारणात प्रवेश केलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे.