मुंबई : देशातील जनतेला इंधनाच्या दरवाढीचे चटके बसत आहे. मात्र, दिवाळीच्या काळात मोदी सरकारकडून याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. सूत्रांने दिलेली माहिती अशी की, दिवाळीच्या काळात इंधनाच्या दरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळते आहे. तसे घडल्यास इंधनाच्या किंमतीत किमान दोन ते तीन रुपयांनी घट होऊ शकते.
जानेवारी महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 35 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून इंधन दरकपात करुन नागरिकांना दिलासा दिला जाऊ शकतो.
मात्र, उत्पादन शुल्कात कपात केल्यास मोदी सरकारला मोठा आर्थिक फटका बसेल. उत्पादन शुल्कात दोन-तीन रुपयांची कपात झाल्यास केंद्र सरकारला मिळणाऱ्या महसूलात 25 हजार कोटींची घट होईल. त्यामुळे केंद्र सरकारकडून या तोट्याचा काही भार पेट्रोलियम कंपन्यांवर टाकला जाऊ शकतो.