श्रीनगर : जम्मू-काश्मीर येथे सुरक्षा दलाच्या टीमने बुधवारी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावलेला आहे. दरम्यान, कुलगाम आणि पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाल्या आहेत. यामध्ये सुरक्षा दलाने 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यापूर्वी मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा दलाने कुपवाडा जिल्ह्यातील गॅंडर्स भागातील हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ ​​उबैद याला ठार केले होते. अशाप्रकारे मागील दोन दिवसांत या खोऱ्यांमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आली आहे, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली आहे. 

जोदार भागात चकमक : पहिली चकमक ही कुलगाममधील जोदार भागात झालेली आहे. सुरक्षा दलाच्या शोधमोहीमेदरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. दरम्यान, प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला असून तो लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले.

पुलवामामधील पुचल भागात दुसरी चकमक : सुरक्षा दलाकडू मिळालेली माहिती अशी की, संबंधित भागात शोध मोहीम राबवण्यात आली. या दरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना ठार केले.  सूञांनी दिलेली माहिती अशी की, या भागात शोध मोहीम सुरूच आहे. काही दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.