एजवाल : आसाम आणि मिझोरम या दोंन्ही राज्यात सुरू असलेला सीमावाद अधिक पेट घेण्याची शक्यता आहे. काल आसाम पोलिसांनी घेतलेल्या अॅक्शनला मिझोरम पोलिसांनी देखील जशास तसे उत्तर दिले असून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, राज्यातील चार वरिष्ठ अधिकारी आणि अन्य लोकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मिझोरमच्या कोलसिब जिल्ह्यात झालेल्या हिंसेवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
मिझोरमचे पोलीस महानिरीक्षक जॉन एन. यांनी सांगितले आहे की, आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबतच इतरांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि हिंसक कृत्यात सामिल असल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यामध्ये आसामच्या 200 हून अधिक अज्ञात पोलिसांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला गेला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक पेटण्याची शक्यता आहे.

आसाम पोलिसांची कारवाई : मिझोरम पोलिसांच्या या कारवाई आधी आसामच्या पोलिसांनी मिझोरमच्या कोलसिब जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त यांच्यासह सहा अधिकाऱ्यांना आसामच्या धोलाई पोलीस ठाण्यात सोमवारी हजर राहण्याचे समन्स जारी केलेले आहे.