मुंबई : मागील १५ दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खानचा तुरुंगवास अद्याप संपलेला नाही. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने वकिलांमार्फत तातडीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला आहे. तसेच, यासंदर्भातली सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी देखील केली आहे. मात्र, न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी पुढची तारीख दिल्यामुळे त्याचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. उद्या किंवा सोमवारी सुनावणी घेतली जावी, अशी मागणी आर्यनने केली असता न्यायालयाने मात्र थेट मंगळवारी सुनावणीची तारीख दिली आहे.
आज न्यायालयात आर्यन खानच्या याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी त्याचे वकील सतीश माने शिंदे यांनी केली होती. उद्या किंवा सोमवारी ही सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. मात्र, यावेळी न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी मंगळवार २६ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. दरम्यान, आर्यन खानसोबतच मुनमुन धामेचाने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर देखील मंगळवारीच सुनावणी होणार आहे.
एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे आता थेट उच्च न्यायायात जामिनासाठी अर्ज करण्याशिवाय पर्याय नव्हता. विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच आर्यनच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर बुधवारीच याचिका सादर करण्यासाठी आर्यनच्या वकिलांनी प्रयत्नही केला. मात्र ते शक्य होऊ न शकल्याने याचिका गुरुवारी सादर करण्यात आली.