उत्तर प्रदेश - हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी आतापर्यंत 19 एफआयआर दाखल केले आहेत, त्यापैकी एका एफआयआरमध्ये देशद्रोह आणि षडयंत्र रचल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पीडितेवर झालल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर तिच्या कुटुंबियांना यूपी सरकार विरोधात खोटं बोलण्यासाठी 50 लाखांची ऑफर देण्यात आल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे.

हा एफआयआर एका पोलीस उपनिरिक्षकाच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना सरकार विरोधात खोटं बोलण्यासाठी 50 लाखांची ऑफर दिली आहे, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. परंतु ही ऑफर नेमके कोणी दिली हे यात नमूद करण्यात आलेले नाही. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातील खोटी विधाने सोशल मीडियावर व्हायरल करून राज्य सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचाही आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

राज्यभरात हाथरस प्रकरणी आतापर्यंत 19 एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत. हे प्रकरण हाताळण्यावरुन टीका होत असताना पोलिसांनी राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या प्रगतीवर नाराज असलेल्यांनी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. त्यानंतर या तक्रारी दाखल करण्यात आल्या. याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी ”हाथरस घटनेमागे मोठे षडयंत्र आहे, आम्ही सत्य काय आहे, याचा तपास करु.” असे म्हटले आहे.