लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक जवळ येत असल्याने सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. प्रियांका गांधी यांना काँग्रेसकडून रिंगणात उतरवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश मधील महिलांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे. तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांना देण्यात येणार आहे, अशी मोठी घोषणा प्रियांका गांधी यांनी केली. 
आज लखनऊ येथे प्रियांका गांधी यांची पञकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत प्रियांका गांधी बोलत होत्या.‘लड़की हूँ लड सकती हूँ’ हा नारा यावेळी त्यांनी दिला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या की, येत्या उत्तर प्रदेश निवडणुकीत आम्ही ४० टक्के तिकिटे महिलांना देण्यात येणार आहे. हा निर्णय त्या सर्व महिलांसाठी आहे ज्यांना उत्तर प्रदेशात बदल हवा आहे. राज्याची प्रगती हवी आहे. महिला राजकारणात पूर्ण सहभागी होतील.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, महिलांना तिकीट जातीच्या आधारावर नाही. तर पात्रतेच्या आधारावर दिले जाईल. आम्हाला उमेदवार मिळतील, आम्हीही लढू. जर तुम्ही या वेळी मजबूत नसलात तर पुढच्या वेळी तुम्ही मजबूत व्हाल. २०२४ मध्ये यापेक्षा जास्त महिलांना संधी मिळू शकते. माझ्या हातात असते तर ५० टक्के तिकीट महिलांना दिले असते. यामागे मुख्य कारण म्हणजे ज्या महिला एकत्रितपणे एक शक्ती बनून लढत नाहीत. त्या महिलांना जाती धर्मात विभागले जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या आहे.