दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा संसर्गाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत चालली आहे. बुधवारी दिवसभरात कोरोनाने १३१ रुग्णांचा मृत्यू झालाय तर २४ तासांत तब्बल ७४८६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोनाला आळा घालण्यासाठी केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

या नियमानुसार, दिल्लीत जर मास्कचा नियमित वापर केला नाही तर २ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. यापूर्वी मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड होता, तरीदेखील लोक मास्कचा वापर करणे टाळत होते. त्यामुळे आता आम्ही दंडाची रक्कम ५०० वरून २ हजार रुपये एवढी केली आहे, असेही केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल म्हणाले, 'दिल्लीतील सर्व खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित केले जात आहेत. तसेच सर्व प्रकारच्या नॉन-क्रिटिकल प्लॅन्ड सर्जरी टाळण्यात याव्यात, असेही सांगितले आहे. तसेच दिल्ली सरकार ६६३ तर केंद्र सरकार ७५० आयसीयू बेडची व्यवस्था करत आहे. त्यानुसार एकूण आयसीयू बेडची संख्या १४०० हून अधिक होईल. त्याचप्रमाणे प्राणवायूसह आरोग्यविषयक अन्य उपकरणेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.'