नवी दिल्ली : कोरोनाने देशाला घट्ट विळखा घातला आहे. दररोज कोरोना बांधितांच्या संख्येबरोबर मृतांची संख्या देखील उच्चांकी गाठत आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीबरोबर मृत्यूचा आकडा देखील झपाट्याने वाढतो आहे. ताजी आकडेवारी धडकी भरवणारी आहे. मागील २४ तासांत कोरोनाने दीड हजारांहून अधिक जणांचे बळी घेतले आहे. 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिवसभरात आढळून आलेल्या बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे मागील २४ तासांत देशात २ लाख ५९ हजार १७० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे १ लाख ५४ हजार ७६१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दररोजच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. तरी काळजीची बाब म्हणजे देशात दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ हजार ७६१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.