लंडन - संपूर्ण जगाचे ज्या गोष्टीकडे लक्ष लागलेले आहे, अखेर ती आनंदवार्ता समोर आलीच. कोरोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने 'फायझर बायोएनटेक'च्या लसीला परवानगी दिली आहे. ही लस पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना दिली जाईल. कोरोनावरील लसीला परवानगी देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. अखेर ब्रिटन सरकारने फायझर व बायोएनटेकच्या लसीला आज परवानगी दिली. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १६ लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत. त्यामुळे या लसीचा वापर सर्वप्रथम रुग्णांवर केला जाणार असल्याचं ब्रिटनच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

ब्रिटनने आपल्या २० दशलक्ष लोकसंख्येसाठी प्रत्येकी दोन डोस असे 40 दशलक्ष डोसची मागणी केली आहे. यातील १० दशलक्ष डोस येत्या काहीच दिवसांत येतील आणि बाकीचे डोस त्यानंतर येतील, अशी माहिती ब्रिटनच्या प्रशासनाने दिलीये. फायझरची लस कोरोनावर ९५ टक्के प्रभावी असून, जर्मनीतील औषध निर्माण कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकनस्थित कंपनी फायझरने युरोपियन युनियनकडे लशीच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे.