मुंबई - दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्व देशात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीत सातत्याने कोरोनाच्या रुग्णांत वाढत होत असून मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केले आहे.

'नो मास्क, नो एंट्री' ही मोहिम आपल्या सर्वांचा कोरोनापासून बचाव करू शकते. मुंबईकरांचा जीव वाचवणे ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे नियमांचे पालन करा, असेही इक्बाल सिंग चहल म्हणाले.

दिल्लीतील कोरोना स्थिती गंभीर होत चालली आहे. दिल्लीतील शहीद भगतसिंग ट्रस्टच्या दोन स्वयंसेवकांनी एक व्हिडिओ पोस्ट करून कोरोना परिस्थितीचे गांभीर्य सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही स्वयंसेवक कोविड मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास मदत करत असून दिल्लीतील नेमकी परिस्थिती कशी आहे, हे सांगितले आहे.

दिल्लीत गेल्या 24 तासात तब्बल 7 हजार 546 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून दिवसभरात 98 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सतर्कता बाळगली जात आहे.