औरंगाबाद / प्रतिनिधी,

औरंगाबाद शहरात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. मागील सातच दिवसांत जिल्ह्यात तब्बल अडीच हजार रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. शहरातील प्रत्येक दुकानात जाऊन ऑक्सिमीटर, थर्मलगनची तपासणी करण्याचे आदेश पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. प्रारंभी शहरातील प्रमुख बाजारपेठांत ही तपासणी केली जाणार आहे.
मध्यंतरी कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी प्रशासनाने 10 ते 18 जुलै शंभर टक्के कडक लॉकडाऊनचा प्रयोग राबविला. या काळात पालिका आयुक्त पांडेय यांनी शहरातील प्रत्येक दुकानदाराला ऑक्सिमीटर आणि थर्मलगनची सक्ती केली होती. पुढे 19 जुलैपासून शहरात अनलॉक करण्यात आले. अनलॉक करताना प्रत्येक दुकानदाराने ऑक्सिमीटर आणि थर्मलगन घ्यावे, असे त्यांनी जाहीर केले होते. जे दुकानदार या दोन्हीही वस्तू घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. तेव्हा व्यापारी महासंघाच्या विनंतीवरुन ऑक्सिमीटर व थर्मलगन घेण्यासाठी त्यांनी दुकानदारांना जुलै अखेरपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र पालिकेच्या पथकांनी प्रत्यक्ष दुकानांत जाऊन आजपर्यंत तपासणी केलेली नाही. मात्र आता पालिका प्रशासनाने पुन्हा या निर्णयाची आठवण झाली आहे. काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. 350 ते 400 रूग्य रोजचे आढळून येत आहे. 1 सप्टेंबरपासून 7 तारखेपर्यंत या सात दिवसांत जिल्ह्यात तब्बल अडीच हजार रूग्णांची वाढ झाली आहे.

बाजारपेठांत गर्दी कायम
शहरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आता प्रत्येक दुकानात जाऊन ऑक्सिमीटर आणि थर्मलगन तपासण्याचे आदेश आयुक्तांनी यंत्रणेला दिले आहे. या आदेशानुसारच सोमवारी निराला बाजार येथील दुकानांची तपासणी पालिकेच्या पथकांनी केली. मंगळवारी देखील हे काम सुरुच होते. दुकानदारांकडे थर्मलगन ऑणि ऑक्सीमीटर नसल्यास कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.