मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवता येणार आहे. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. 

नव्या नियमानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यामुळे ग्राहक फोनवरुन संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान घरी मागवू शकतात. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही 7 ते 11 ची मर्यादा घालण्यात आली आहे.

कसे आहेत नवे नियम ?
किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान, डेअरी, चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, खासगी पेट्रोलपंप विक्री हे सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहणार आहेत. नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळे, आठवडी बाजार, दारुची दुकाने, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहणार आहेत.