नवी दिल्ली : एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशाला सावधानतेचा मोठा इशारा दिलाय. भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार आहे. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही, असे डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले आहे. ‘इंडिया टुडे’ने डॉ. रणदीप गुलेरिया यांची मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी हा इशारा दिला आहे. 

लॉकडाऊन करण्याची गरज
कोरोना महामारी अशीच वाढत राहिली आणि इम्यून एस्केप मॅकेनिझ्म विकसित करण्यात यशस्वी झाल्यास भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन उपयोगी नाही. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडकडीत लॉकडाऊन लागू करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कमीत कमी दोन आठवड्यांसाठी तरी हा कडकडीत लॉकडाऊन असायला हवा. जर रुग्णसंख्या लवकर घटली, तर आपण तो लवकरही उठवू शकतो,” असेही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

तीन गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज
सध्या तीन गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णालयातील वैद्यकीय सेवेत सुधारणा घडवून आणणे, कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि लसीकरणाची मोहीम गतीमान करणे, या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. जर आपण माणसामाणसांतील संपर्क टाळू शकलो, तर रुग्णसंख्या कमी होईल, असे गुलेरिया यांनी सांगितले.

सर्वांचे लसीकरण व्हायलाच हवे
सध्या वीकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यू लावण्याची काही गरज नाही. लॉकडाऊन काही काळासाठी लावावाच लागणार आहे. कोरोनाचा व्हायरस ज्या पद्धतीने विकसीत होत आहे. त्यावरून देशात तिसरी लाट येण्याची शक्यता बळावली आहे. लोकांची इम्युनिटी वाढवण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.