औरंगाबाद / प्रतिनिधी

माणुसकीला काळिमा फासणारी घटना नुकतीच समोर आली आहे. आपल्या जन्मदात्रीला कोरोना झाल्याने तिच्या निष्ठुर नातेवाईकांनी अंधार्‍या रात्रीत जंगलात नेऊन फेकून दिले होते. असहाय अवस्थेत जंगलात खितपत पडलेल्या या वृद्धेला अखेरीस पोलीस व माणुसकी समूहाचे सदस्य देवदूतांच्या रूपात भेटले. त्यामुळे या वृद्धेला जीवदान मिळाले आहे. उपचारानंतर ती वृद्धा आता कोरोनामुक्त झाली असून तिचे एका पुनर्वसन केंद्रात पुनर्वसन केले आहे. माणुसकी समूहाचे अध्यक्ष सुमित पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शहरातील कच्ची घाटी परीसरातील पीरवाडी जंगल परीसरात 7 ऑगस्ट रोजी रात्रीच्या अंधारात एक 90 वर्षीय आजीबाई पडलेली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना कळविली. त्या आजीला तिच्या नातेवाईकांनी रात्रीच्या वेळी रिक्षातून आणून जंगलात फेकले होते. ही माहिती मिळताच तात्काळ चिकलठाणा पोलिसांनी तसेच माणुसकी समूहाने वद्धेला ताब्यात घेत तिला शासकीय रुग्णालय (घाटी)त दाखल केले. प्रारंभिक उपचारातच डॉक्टरांनी तिला कोरोना झाल्याची पुष्टी केली. तब्बल 19 दिवस घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता ती वृद्धा कोरोनामुक्त झाली आहे. वृद्धेला जीवनदान मिळाले असून याकामी चिकलठाणा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार आजिनाथ शेकडे व रविंद्र साळवे यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे पंडित यांनी सांगितले. मात्र ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, समाजात अशाप्रकारे कोणी आपल्या जन्मदात्यांना त्रास देत असेल तर त्याच्यावर कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करू, असा इशारा चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी दिला आहे. दरम्यान, ही वृद्ध आजी कोरोनामुक्त झाल्यानंतर तिला घाटी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र तिला ठेवायचे कुठे हा प्रश्‍न होताच. माणुसकी समूहाने मदर टेरेसा आश्रमात विचारपूस केली असता कोरोनामुळे नवीन प्रवेश बंद असल्याचे उत्तर मिळाले. अखेरीस पंडित यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने आजींना तेथे प्रवेश मिळवून दिला.

नातेवाईकांवर गुन्हा दाखल

या 90 वर्षीय वृद्धेला जंगलात फेकून दिल्याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या टीमने वृद्धेच्या नातेवाईकांचा शोध घेतला. ही वृद्धा नारेगाव ब्रिजवाडी परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. माता-पिता ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 कलम 24 नुसार यात दोषींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे सुमित पंडित यांनी स्पष्ट केले.

अशा रुग्णांची फरपट कितपत योग्य?

कोरोनामुळे सध्या नवीन मनोरुग्णांना पुनर्वसन केंद्रात दाखल केले जात नसल्याचा अनुभव आम्हाला अनेकवेळा आलेला आहे. अशा रुग्णांना आधाराची गरज असते. परंतु केंद्रांकडून त्यांना नाकारले जाते ही गंभीर बाब आहे. मनोरुग्णांची होत असलेली फरपट पाहताना मन हेलावते. मनपाकडून किंवा शासनाने याकडे लक्ष देत मनरुग्णांना दिलासा देणे गरजेचे आहे. -सुमित पंडित, अध्यक्ष, माणुसकी समूह.