मुंबई : राज्यात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी 15 दिवस ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदी आदेश लागू केलेले होते. तरीही राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. अशावेळी राज्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या त्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यावेळी मुख्यमंत्री कडक लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर करतील असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच लसीकरणाबाबत महाराष्ट्राचा अॅक्शन प्लॅन ठरला आहे, असेही टोपेंनी सांगितले. परदेशातून लसी मागवल्या जाणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे परदेशातील लसींना परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्राकडे केली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. लसीकरण वाढले की हर्ड इम्युनिटीच्या दिशेने आपण जाऊ शकू, असेही टोपे म्हणाले. भारतातील लसीचे उत्पादन मर्यादित आहे. महाराष्ट्रातील किमान 10 कोटी जनतेला लस द्यायची म्हटले तरी देशातील लसी पुरणार नाहीत, त्यामुळे परदेशातील लसींना परवानगी द्या, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय...
राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावला जावा, अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लागू करणे आवश्यक आहे. कडक लॉकडाऊन हवे, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत, असेही टोपे म्हणाले.