औरंगाबाद / प्रतिनिधी

  आजपर्यंत औरंगाबाद शहरात सुमारे पंधरा हजार कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी सुमारे चार हजार नागरिक हे 50 वर्षांवरील असून अशा ज्येष्ठांनाच कोरोनापासून अधिक धोका आहे. अशा नागरिकांना वेळीच उपचार देण्यासाठी महापालिकेने माझे आरोग्य माझ्या हाती (एमएचएमएच) अ‍ॅपद्वारे वॉच ठेवला आहे. अशा एक लाखापेक्षा अधिक नागरिकांचा डेटा पालिकेने संकलित केला असून कंट्रोल रूमद्वारे एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची तब्येत बिघडल्यास उपचाराविषयी मार्गदर्शन, वेळप्रसंगी पालिकेचे आरोग्य सेवत संबंधित घरी जाऊन उपचाराची सेवा देखील देत आहेत.

  शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आजपर्यंत झालेल्या मृतांपैकी 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचेच प्रमाण अधिक आहे. यामुळे मृत्युदर कमी करण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी माझे आरोग्य माझ्या हाती हे मोबाइल अ‍ॅप तयार करून घेत शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण केले. एक हजार मोबाईल फिवर क्लिनिकव्दारे थर्मलगन, ऑक्सीमिटरच्या साह्याने तब्बल 1 लाख 4,889 ज्येष्ठ नागरिकाचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. याव्दारे कोविड केअर सेंटर, खासगी व सरकारी हॉस्पिटलमधील खाटांची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. स्वत:ची माहिती नागरिक या अ‍ॅपमध्ये भरू शकतात. ती कंट्रोलरूमला प्राप्त होते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर उपचार करण्यास मदत होत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. आजघडीला शहरात रविवारी दि.30 प्राप्त अहवालानुसार 15 हजार 193 कोरोना रूग्ण आढळले आहेत. यापैकी 25.90 टक्के म्हणजे 3,936 रूग्ण हे 50 वर्षांवरील आहेत. सिरो सर्वेक्षणातून तर शहरात कोरोनाचा समुह संसर्ग सुरू झाला असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे अद्यापही शहरात कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याने पालिकेने ज्येष्ठ नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

 वयोगटानुसार बाधितांची आकडेवारी
- 00 ते 05 वर्ष वयोगटातील रूग्ण : 0417
- 05 ते 18 वर्ष वयोगटातील रूग्ण : 2136
- 18 ते 50 वर्ष वयोगटातील रूग्ण : 8704
- 50 वर्षांवरील वयोगटातील रूग्ण : 3936
शहरातील एकूण बाधितांची संख्या : 15,193.