औरंगाबाद / प्रतिनिधी

  लढाई अवघड...पण उपाय सोपे! मीच माझा रक्षक!! ही भूमिका समोर ठेऊन बजाज ऑटो कंपनीच्या शिवशक्ती गणेश मंडळाने यंदा आगळावेगळा देखावा समाजप्रबोधनाच्या दृष्टिकोनातून सादर केला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी जनतेने कोणत्या सोप्या पध्दती अंगवळणी पाडाव्यात. याचे सोपे उपाय देखाव्यातून सादर केले आहेत. याशिवाय महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना कोरोना संरक्षण किटचे वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे सॅनिटायझर्सचे सेंसर असलेले हँड डिस्पेंसिंग मशीन किलेअर्क येथील कोवीड सेंटरला सोमवारी भेट म्हणून दिले जात आहे.

  कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या पध्दतीने साजरा केला जात आहे. यंदा देखावे नसले तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत. बजाज ऑटो कामगारांच्या न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळाच्या वतीने समाजप्रबोधन आणि कोरोना संरक्षण किटचे वाटप केले जात आहे. मागील 35 वर्षांपासून या गणेश मंडळाने वेगवेगळे समाजप्रबोधनाचे विषय गणेशोत्सवाच्या काळात हाताळले आहेत. पण यंदा कोरोनाचे सावट असल्याने डेकोरेशन व मिरवणुकीवरील खर्च टाळून कोविडविरुध्दच्या लढाईसाठी कोविड सेंटर्सना आवश्यक त्या साधनसामुग्रीचे वाटप केले जात आहे. कोविडविरुध्द लढा देण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत ‘मीच माझा रक्षक’ म्हणत गणेश मंडळाने आवाहन केले आहे. मध्यंतरी वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्याचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले. तर कंपनीतील मशिनरींचे देखील नित्यनियमाने निर्जंतुकीकरण केले जात आहे. यंदाच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष इंद्रकुमार जाधव, कार्याध्यक्ष बबन पुरी, कोषाध्यक्ष सुधाकर ढगे, सचिव सुहास जोशी, उपाध्यक्ष रामराव धुळगुंडे, शिवाजी आपरे तर समन्वयक विजय लोणीकर आहेत.

तीन हजार कर्मचार्‍यांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट........

  बजाज ऑटो कंपनीने कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी काय-काय उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचेही सादरीकरण गणेश मंडळाने केले आहे. कंपनीतील सर्व कामगार, कंत्राटी कामगार अशा तीन हजार जणांच्या आजवर अ‍ॅन्टिजेन टेस्ट केल्या आहेत. रोग प्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप केले. नियमित शारीरीक तपासणी केली जात आहे. कर्मचा-यांना दररोज चहा ऐवजी आयुष काढा दिला जात आहे. बजाजनगरात 230 बेडचे कोविड सेंटर बजाज अ‍ॅटो कंपनीने उभारले आहे. याशिवाय हाताचा स्पर्श टाळण्यासाठी वॉटर कुलर, दरवाजे उघडण्यासाठी पायाचा उपयोग व्हावा, म्हणून तशी उपकरणे बसवली आहेत.

कोविड सेंटर्सना हातभार ............
  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा देखावा सादर न करता गणेश मंडळाच्या वतीने सॅनिटायझर्सचे हँड डिस्पेंसिंग मशीन किलेअर्क येथील कोविड सेंटरला सोमवारी भेट म्हणून दिले जात आहे. याशिवाय महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना ग्लोज, मास्क, कॅप आणि काढ्याचे पाकिट दिले जाणार आहे. याशिवाय गणेश विसर्जनानंतर एमआयटी व किलेअर्क येथील कोविड सेंटर्सला आणखी मदत केली जाणार आहे.
- विजय लोणीकर, समन्वयक.